वाशिम : जिल्ह्यात बाल कामगार प्रथेविरुद्ध ७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत जनजागृती मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, सरकारी कामगार अधिकारी गौरव र. नालींदे, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाचे श्री. राठोड यांच्यासह चाईल्ड लाईनचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हिंगे यांच्या हस्ते बाल कामगार प्रथाविरोधी संदेश देणाऱ्या फलकांचे अनावरण करण्यात आले. श्री. नालींदे यांनी महिनाभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती संबंधीत विभागांना दिली. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील बालकामगार बहुल क्षेत्र निर्धारित करुन तपासणी करणे, संबंधित मालकांकडून बालकामगार कामास न ठेवण्याबाबत हमीपत्र घेण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील हॉटेल असोसिएशनच्या बैठकांमध्ये तसेच व्यापारी संघटनांचे चर्चासत्र घेऊन जनजागृती करणे, महामार्गावरील विविध ढाब्यांची तपासणी करणे, सामुहिक शपथ घेणे, जनजागृतीपर स्पर्धा घेणे, प्रचार प्रसिद्धी करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बाल कामगार प्रथेविरुद्ध जनजागृती मोहिमेचा शुभारंभ